मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.

  2. माझे लोक माझे नाव जाणतील; म्हणून त्या दिवशी त्यांना समजेल कि ते भविष्यकथन करणारा तो मीच आहे. होय, तो मीच आहे.”

  3. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  4. ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील.

  5. यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे.

  6. याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.

  7. निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.

  8. परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही वा घाईने निघावे लागणार नाही; कारण याहवेह तुमच्यापुढे जातील, आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील.

  9. पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल; तो उच्च केला जाईल व उत्कर्ष पावेल आणि त्याचे मोठे गौरव होईल.

  10. जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते— त्याचे स्वरूप मनुष्यप्राण्याच्या पलीकडे विद्रुप करण्यात आले होते आणि त्याचा आकार मानवसदृश्य राहिला नव्हता—

  11. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

  12. त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते.

  13. तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.

  14. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला.

  15. अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.

  16. परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल.

  17. वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.

  18. म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.

  19. “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” असे याहवेह म्हणतात.

  20. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.

  21. याहवेह तुला माघारी बोलावतील जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस— केवळ टाकून देण्याकरिता जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात.

  22. “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता, पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन.

  23. क्षणिक रागाच्या भरात मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते, परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने मी तुझ्यावर करुणा करेन,” असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात.

  24. “हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे, मी पृथ्वी पुन्हा नोआहच्या जलाने आच्छादित करणार नाही, अशी मी शपथ वाहिली होती. आता ही शपथ वाहतो, यापुढे तुझ्यावर क्रोधित होणार नाही, तुला पुन्हा कधीही रागविणार नाही.

  25. कारण पर्वत हलतील व टेकड्या काढून टाकल्या जातील, परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,” असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात.