मुख्य मजकुरावर जा

प्रकटीकरण१८

देवदूत बाबेलच्या पतनाची घोषणा करतो

त्यानंतर स्वर्गातून दुसरा एक देवदूत खाली उतरतांना मी पाहिला. त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रखर तेजाने पृथ्वी उजळून निघाली.
तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!
तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”

बाबेलपासून वेगळे होण्याचे आवाहन

मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.
कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे.
तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.”
तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”
म्हणूनच तिला मरण, शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील. अग्नीने तिला जाळून टाकण्यात येईल. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहेत.

राजे आणि व्यापारी शोक करतात

“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,
१०
तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, ती सामर्थ्यशाली नगरी! एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्‍हाड कोसळली आहे!’
११
“पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही:
१२
सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, कास्य, लोखंड, संगमरवरी दगड,
१३
तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक.
१४
“ते म्हणतील, ‘ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापासून घेतली गेली आहेत, सर्व विलास आणि वैभवी गोष्टी तुझ्यापुढून गेली आहेत; त्याचा तुला कधीच पुनर्लाभ होणार नाही.’
१५
जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील.
१६
ते आक्रोश करून म्हणतील: “ ‘हाय! हाय! ही इतकी सुंदर महानगरी! जांभळ्या, किरमिजी तलम वस्त्रांनी सजलेल्या, सोन्यामोत्यांच्या अलंकारांनी नटलेल्या स्त्रीसारखी ही सुंदर महानगरी!
१७
एका क्षणात तिची सर्व संपत्ती नष्ट झाली!’ “प्रत्येक जहाजाचे कप्तान आणि खलाशी व समुद्रापासून उत्पन्न मिळविणारे सर्वजण दूर अंतरावर उभे राहतील,
१८
धुराच्या उसळणार्‍या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सर्व जगात शोधून तरी सापडेल काय?’
१९
मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील: “ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही! ज्या सर्वांकडे जहाजे होती ते तिच्यामुळेच श्रीमंत झाले, आणि आता ती एका तासात उद्ध्वस्त झाली!’

देवाच्या न्यायामुळे स्वर्ग आनंदित होतो

२०
“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”
२१
मग एका बलवान देवदूताने, जात्याच्या तळीच्या आकाराचा एक मोठा दगड उचलून समुद्रात टाकला व तो ओरडून म्हणाला: “ते महान नगर बाबिलोन अशाच हिंसक रीतीने खाली फेकले जाईल व ते कायमचे नाहीसे होईल.”
२२
त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा आढळणार नाहीत. तिथे गिरणीचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.
२३
दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.
२४
पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन, यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options