नीतिसूत्रे२६
Listen to this chapter
0:00
0:00
मूर्ख व मूर्खपणाविषयी नीतिवचने
१
ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही.
२
जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही.
३
घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे!
४
मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील.
५
मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.
६
मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे.
७
मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे.
८
मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे.
९
जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने.
१०
जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्या धनुर्धारीसारखा आहे.
११
जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.
१२
आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
आळशीपणाचा मूर्खपणा
१३
आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!”
१४
दार त्याच्या बिजागर्यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो.
१५
आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो.
१६
स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.
कलह व चुगली टाळणे
१७
आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्यासारखे असतात.
१८
जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो,
१९
तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!”
२०
लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
२१
जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो.
२२
अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
फसवणूक व द्वेषाचा धोका
२३
गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे.
२४
शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात.
२५
जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते.
२६
त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल.
२७
जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.
२८
लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note