उत्पत्ती १९:१७-३६
१७
दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!”
१८
यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका!
१९
तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन.
२०
पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.”
२१
तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही.
२२
पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.)
२३
सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला.
२४
मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला;
२५
आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला.
२६
परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली.
२७
दुसर्या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला.
२८
त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले.
२९
मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले.
३०
पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगरातील एक गुहेमध्ये जाऊन राहिला.
३१
एके दिवशी थोरली मुलगी धाकट्या बहिणीला म्हणाली, “आपले वडील म्हातारे झाले आहेत आणि आजूबाजूला एकही पुरुष नाही की जो आपल्याला मूल देईल—जशी पृथ्वीवरील प्रथा आहे.
३२
तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.”
३३
त्या रात्री त्यांनी लोटाला भरपूर मद्य पाजले. मग थोरली आत गेली आणि तिने आपल्या वडिलांबरोबर शय्या केली; ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते!
३४
दुसर्या दिवशी सकाळी थोरली मुलगी आपल्या धाकट्या बहिणीस म्हणाली, “काल रात्री मी आपल्या वडिलांबरोबर शय्या केली, आज रात्रीही आपण त्यांना भरपूर मद्य पाजू आणि मग तू त्यांच्याशी शय्या कर म्हणजे अशा रीतीने आपला वंश आपल्या वडिलांद्वारे पुढे चालेल.”
३५
त्याप्रमाणे त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना पुन्हा भरपूर मद्य पाजले. मग धाकटी मुलगी आत गेली आणि त्याच्यासोबत शय्या केली. ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते!
३६
अशा रीतीने लोटाच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गर्भवती झाल्या.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings