Skip to content
यहेज्केल ४०:१-२७

यहेज्केल ४०:१-२७

आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले.
परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या.
याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.
तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”
मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.
मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्‍या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.
पहारेकर्‍यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता.
त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले;
ते आठ हात होते आणि त्याचे खांब दोन हात होते. वेशीची देवडी मंदिरासमोर होती.
१०
पूर्वेकडील द्वाराच्या आतून प्रत्येक बाजूला तीन चौक्या होत्या; त्या तीनही एकाच मापाच्या होत्या आणि प्रत्येक बाजूच्या भिंतींचे माप सुद्धा सारखेच होते.
११
मग त्याने वेशीच्या प्रवेशद्वाराची रुंदी मापली; ती दहा हात होती आणि त्याची लांबी तेरा हात होती.
१२
प्रत्येक चौकीच्या समोर एक हात उंच भिंत होती आणि चौक्या दोन्ही बाजूंनी सहा हात होत्या.
१३
मग त्याने एका चौकीच्या भिंतीच्या मागच्या बाजूच्या वरपासून दुसर्‍या भिंतीच्या वरपर्यंतचे वेशीचे माप घेतले; त्यातील अंतर एका कठड्यापासून दुसर्‍यापर्यंत पंचवीस हात मापले.
१४
त्याने वेशीच्या आतील बाजूने भिंतींचे सर्वबाजूंनी माप घेतले ते साठ हात होते. हे माप अंगणासमोरील देवडीपर्यंत होते.
१५
वेशीच्या प्रवेशद्वारापासून तिच्या शेवटच्या देवडीपर्यंत तिचे माप पन्नास हात होते.
१६
वेशीच्या आतील चौक्या आणि भिंतीच्या चहूबाजूंना झरोके असलेले कठडे होते, तसेच देवडींनाही आतील बाजूने झरोके होते. भिंती खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून सजविल्या होते.
१७
मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या.
१८
त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती.
१९
मग त्याने खालच्या वेशीच्या आतील बाजूपासून आतील अंगणाच्या बाहेरच्या बाजूपर्यंतच्या अंतराचे माप घेतले; त्याचे माप पूर्वेकडून तसेच उत्तरेकडूनही शंभर हात होते.
२०
मग त्याने बाहेरील अंगणाकडे जाणाऱ्या उत्तरेकडील द्वाराची लांबी व रुंदी मापली.
२१
त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन चौक्या होत्या; त्याच्या भिंती आणि देवडीचेही तेच माप होते जे पहिल्या वेशीचे होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.
२२
त्याचे झरोके, त्याची देवडी आणि त्याचे खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेली सजावट यांचे माप पूर्वेकडील द्वाराच्या मापाइतकेच होते. त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याची देवडी त्याच्यासमोर होती.
२३
जसे पूर्वेच्या बाजूने होते तसेच आतील अंगणातही एक द्वार होते जे उत्तरेच्या बाजूने होते. त्याने एका द्वारापासून त्याच्या समोरील द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात मापले.
२४
मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले आणि मी दक्षिणेच्या बाजूला द्वार पाहिले. त्याने त्याच्या खांबांचे व देवडीचे माप घेतले आणि इतर खांब व देवडींप्रमाणेच याचेही माप होते.
२५
त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
२६
त्याच्यावर जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याच्यासमोर देवडी होती; त्याच्या भिंतींच्या प्रत्येक बाजूला खजुरीच्या झाडाचे कोरीवकाम केलेली सजावट होती.
२७
आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options