1 राजे १:२६-५०
२६
परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही.
२७
हे सर्व माझ्या स्वामीने त्यांच्यानंतर राजासनावर कोणी बसावे हे आपल्या सेवकाला न कळवताच केले आहे काय?”
२८
मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली.
२९
तेव्हा राजाने शपथ वाहून म्हटले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले, त्या जिवंत याहवेहची शपथ,
३०
याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.”
३१
तेव्हा बथशेबाने भूमीकडे आपले मुख लवून राजासमोर दंडवत घातले आणि म्हटले, “दावीद, माझे स्वामी सदा चिरायू होवोत!”
३२
दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले,
३३
राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.
३४
तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’
३५
नंतर तुम्ही त्याच्यासोबत वर जावे आणि त्याने येऊन माझ्या राजासनावर बसून माझ्या जागेवर राज्य करावे. मी त्याला इस्राएलचा आणि यहूदीयाचा राज्यकर्ता नेमले आहे.”
३६
यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत.
३७
याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”
३८
तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.
३९
सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.”
४०
आणि सर्व लोक पावा वाजवित आणि मोठा आनंदोत्सव करीत त्याच्यामागे गेले, त्यांच्या घोषणांनी जमीन हादरली.
४१
अदोनियाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व पाहुण्यांनी मेजवानी संपत असता हा आवाज ऐकला. कर्ण्यांचा आवाज ऐकताच योआबाने विचारले, “शहरात हा सर्व आवाज का येत आहे?”
४२
तो हे बोलत असताच, अबीयाथार याजकाचा पुत्र योनाथान आला. अदोनियाह त्याला म्हणाला, “आत ये. तुझ्यासारख्या योग्य मनुष्याने चांगलीच बातमी आणली असणार.”
४३
योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे.
४४
राजाने त्याच्यासोबत सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी आणि पलेथी यांना पाठविले आहे आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसविले आहे,
४५
आणि सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा राजा म्हणून गीहोन येथे अभिषेक केला आहे. तिथून ते मोठ्या आनंदाने वर गेले आणि शहरात त्या आवाजाचा नाद होत आहे. तोच आवाज आपण ऐकत आहात.
४६
शिवाय, शलोमोनने राजासनावरील आपले स्थान घेतले आहे.
४७
तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले
४८
आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ”
४९
त्यावेळी, अदोनियाहचे सर्व पाहुणे घाबरून उठले आणि पांगून गेले.
५०
परंतु अदोनियाहने शलोमोनच्या भीतीने जाऊन वेदीवरील शिंगे धरून ठेवली.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings