Shepherd बद्दल बायबलमधील वचने: Angels appeared to
Angels appeared to बद्दल वचने
आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते.
इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले.
परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल.
आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे.
त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.”
अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले,
“सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”
देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभूने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.”
ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले.
त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, ते सर्वठिकाणी विदित केले.
मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले.
परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे.
मेंढपाळांना जे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्वगोष्टी घडल्या व त्यांनी सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्यानंतर ते परमेश्वराचे गौरव व स्तुती करीत परत गेले.