Jephthah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
गिलआदी इफ्ताह हा एक महान योद्धा होता. त्याच्या पित्याचे नाव गिलआद; त्याची आई एक वेश्या होती.
गिलआदाच्या पत्नीने सुद्धा त्याच्या पुत्रांना जन्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला हाकलून दिले. ते त्याला म्हणाले, “आमच्या पित्याच्या वतनातून तुला काहीही मिळावयाचे नाही, कारण तू दुसर्या स्त्रीचा पुत्र आहेस.”
जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले.
त्यांनी इफ्ताहाला म्हटले, “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आपण अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करू.”
गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?”
गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.”
गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?”
गिलआदाच्या वडिलांनी इफ्ताहाला उत्तर दिले, “याहवेह आमचे साक्षी आहेत; तुम्ही सांगाल तसे आम्ही नक्कीच करू.”
तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले.
मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले.
इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल,
आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.”
नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले.
अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले.
जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.
जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.”
“माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.
परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”
त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, तू जाऊ शकते.” त्याने तिला दोन महिन्यांसाठी जाऊ दिले. ती आणि तिच्या सख्या डोंगरावर गेल्या आणि तिचा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक केला.
दोन महिन्यानंतर ती आपल्या पित्याकडे परत आली आणि त्याने नवस केल्याप्रमाणे तिच्यासोबत केले आणि ती कुमारिका होती. त्यानंतर इस्राएली लोकांमध्ये प्रथा पडली,
की प्रत्येक वर्षी इस्राएली कुमारिकांनी चार दिवस डोंगरांवर जावे आणि गिलआदी इफ्ताहाच्या कन्येच्या स्मरणात शोक करावा.