The Levites बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले.
मग मोशे त्यांना म्हणाला, “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर असे म्हणतात: ‘प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधावी. छावणीतून एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत फिरत, प्रत्येकाने आपला भाऊ आणि मित्र व शेजारी यांना जिवे मारून टाकावे.’ ”
मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले.
परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.
याहवेहने मोशेला सांगितले होते:
“लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.
याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले,
“आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”
याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.
मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी.
आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”
याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली.
एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.
याहवेह मोशेला आणखी म्हणाले,
“इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे.
ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.
मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे.
“समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.
त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
“यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.
मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे.
“मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
“पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी.
“कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी.
मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.