Doubting बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आणि इजिप्तचे लोक तुला पाहतील व म्हणतील, ‘ही याची पत्नी आहे.’ मग ते मला मारून टाकतील आणि तुला जगू देतील.
तू माझी बहीण आहेस असे सांग, म्हणजे तुझ्यामुळे मला ते चांगले वागवतील आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचेल.”
म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?”
तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली?
याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”
मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का?
मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”
फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली.
ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?
आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”
पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’
गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”
याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.”
परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’
तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?”
तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले.
ओबद्याह वाटेने चालत असता, त्याला एलीयाह भेटला. ओबद्याहने त्याला ओळखले व जमिनीकडे लवून त्याला दंडवत घालत म्हटले, “माझे स्वामी, एलीयाह ते आपणच आहात काय?”
एलीयाह म्हणाला, “होय, जा, तुझ्या धन्याला सांग एलीयाह येथे आहे.”
तेव्हा ओबद्याहने विचारले, “माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे, की तुम्ही आपल्या सेवकाला मारून टाकावे म्हणून अहाबाच्या स्वाधीन करीत आहात?
याहवेह, आपल्या जिवंत परमेश्वराची शपथ, आपला शोध करण्यासाठी माझ्या धन्याने लोक पाठवले नाही असा एकही देश किंवा राज्य नाही. आणि त्या देशात किंवा राज्यात एलीयाह नाही असे कोणी सांगितले, तर एलीयाह त्यांना सापडला नाही असे त्यांना शपथ घेऊन सांगावे लागत असे.
परंतु आता आपण मला सांगता त्याला जाऊन सांग, ‘एलीयाह येथे आहे.’
मी तुम्हाला सोडून गेल्यावर याहवेहचा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे मला ठाऊक नाही. पण जर मी जाऊन अहाबाला सांगितले आणि त्याला तुम्ही सापडला नाही, तर तो मला मारून टाकील. मी तर आपला सेवक, माझ्या बालपणापासून याहवेहची उपासना करीत आलो आहे.
ईजबेल राणी प्रभूच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा मी काय केले हे तुम्ही ऐकले नाही काय? एका गुहेत पन्नास असे शंभर याहवेहच्या संदेष्ट्यांना मी दोन गुहांमध्ये लपविले आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.
आणि आता तुम्ही मला म्हणता, जाऊन माझ्या धन्याला मी सांगावे, ‘एलीयाह येथे आहे,’ तो मला मारून टाकील!”
जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”