मत्तय २६:१-१६
१
आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले,
२
“जसे तुम्हाला माहीत आहे की, वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणाला दोनच दिवसांचा अवधी आहे आणि मानवपुत्र क्रूसावर खिळण्यासाठी धरून दिला जाईल.”
३
नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.
४
आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते.
५
पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
६
येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.
७
तिथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते बसले असताना येशूंच्या मस्तकावर तेल ओतले.
८
जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला?
९
हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”
१०
हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
११
गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.
१२
माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे.
१३
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे ही शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
१४
यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला.
१५
आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली.
१६
त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
Settings