Skip to content
मत्तय २२:२३-४६

मत्तय २२:२३-४६

२३
त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले.
२४
“गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.
२५
आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली.
२६
पण हीच गोष्ट दुसर्‍या व तिसर्‍या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली.
२७
सर्वात शेवटी ती स्त्री मरण पावली.
२८
जेव्हा, पुनरुत्थान होईल तेव्हा ती कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”
२९
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता.
३०
पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.
३१
पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय?
३२
‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.”
३३
सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली.
३४
येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले.
३५
कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला:
३६
“गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?”
३७
येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’
३८
हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे.
३९
यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’
४०
सर्व नियम आणि संदेष्ट्यांची शिकवण या दोन आज्ञांवरच आधारित आहे.”
४१
एकदा परूशी लोक एकत्र गोळा झाले असताना, येशूंनी त्यांना विचारले,
४२
“ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” “तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले.
४३
येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो?
४४
“ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’
४५
जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?”
४६
यावर त्यांना काही उत्तर देता येईना आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options