Skip to content
उत्पत्ती ४५:१०-२८

उत्पत्ती ४५:१०-२८

१०
म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल.
११
मी तुमची या ठिकाणी काळजी घेईन, कारण आपल्यापुढे दुष्काळाची अजून पाच वर्षे आहेत आणि तुम्ही इकडे आला नाही तर, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह निराधार व्हाल.’
१२
“तुम्ही हे स्वतः बघत आहात व माझा भाऊ बिन्यामीनही बघत आहे, की खरोखर मीच तुमच्याशी बोलत आहे.
१३
आपल्या वडिलांना इजिप्तमध्ये मला देण्यात आलेला आदर आणि जे सर्वकाही तुम्ही पाहिले ते सांगा आणि त्यांना माझ्याकडे तत्परतेने घेऊन या.”
१४
मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला.
१५
मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.
१६
योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्‍यांना अतिशय आनंद झाला.
१७
फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा,
१८
आणि तुमचे वडील व सर्व कुटुंबीय मंडळी यांना इजिप्तमध्येच राहण्यासाठी घेऊन या. त्यांना सांगा, फारोह तुम्हाला इजिप्त देशातील सर्वात सुपीक प्रदेश बहाल करेल म्हणजे या देशातील उत्तम पदार्थ तुम्हाला खावयास मिळतील.’
१९
“आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा.
२०
तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ”
२१
इस्राएलच्या पुत्रांनी तसेच केले. फारोहच्या आज्ञेप्रमाणे योसेफाने त्यांना सामान आणण्यासाठी गाड्या दिल्या; तसेच प्रवासासाठी अन्नधान्यही दिले.
२२
त्याने त्या प्रत्येकाला नवीन पोशाख दिला, परंतु बिन्यामीनाला त्याने पाच नवीन पोशाख आणि तीनशे शेकेल चांदी दिली.
२३
त्याने आपल्या वडिलांसाठी इजिप्तमधील सर्वोत्तम वस्तूंनी लादलेली दहा गाढवे पाठवली. प्रवासासाठी धान्य व खाद्यपदार्थ यांनी लादलेल्या दहा गाढवीही रवाना केल्या.
२४
अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!”
२५
निरोप घेऊन ते इजिप्तमधून निघाले व कनान देशात आपले वडील याकोब याच्याकडे आले.
२६
ते त्यांना म्हणाले, “योसेफ अजून जिवंत आहे! तो इजिप्त देशाचा अधिपती झाला आहे.” हे ऐकून याकोब अवाक झाला; त्याचा त्याच्या पुत्रांच्या बातमीवर विश्वास बसेना.
२७
परंतु जेव्हा त्यांनी त्याला योसेफाचा निरोप सांगितला आणि योसेफाने पाठविलेल्या धान्याच्या गाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा त्यांचा पिता याकोब याच्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त झाले.
२८
आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options