उत्पत्ती १४:१३-२४
१३
या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता.
१४
लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला.
१५
रात्रीच्या वेळी अब्रामाने युद्ध करण्यासाठी आपले सैन्य विभागले आणि त्याने या सैन्यावर यशस्वी हल्ला केला आणि त्याच्यापुढून पळून जाणार्या सैन्याचा त्याने दिमिष्काच्या उत्तरेकडे असलेल्या होबाह या शहरापर्यंत पाठलाग केला.
१६
त्याने सर्व मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट, याची मालमत्ता, स्त्रिया आणि कैद करून पळविलेले लोटचे इतर लोकही परत मिळविले.
१७
केदोरलाओमेर व त्याचे मित्र असलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राम परत चालला असताना सदोमचा राजा शावेहच्या खोर्यात (या खोर्यास पुढे राजांचे खोरे असे नाव पडले) त्याला भेटावयास आला.
१८
शालेमचा राजा मलकीसदेक जो परात्पर परमेश्वराचा याजक होता, तो अब्रामाला भाकर व द्राक्षारस घेऊन आला.
१९
आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो.
२०
ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला.
२१
सदोमच्या राजाने अब्रामाला म्हटले, “लोक मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”
२२
यावर अब्रामाने सदोमाच्या राजाला उत्तर दिले, “आकाश व पृथ्वी यांना निर्माण करणारा परात्पर याहवेह परमेश्वर यांना मी हात उंच करून वचन दिले आहे,
२३
‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही.
२४
माझ्या या तरुण माणसांनी जेवढे अन्न खाल्ले आहे तेवढ्यांचाच मी स्वीकार करेन, मात्र माझे मित्र आनेर, अष्कोल आणि मम्रे यांना त्यांचा वाटा मिळो.”
Settings