Skip to content
2 शमुवेल १३:२४-३९

2 शमुवेल १३:२४-३९

२४
अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?”
२५
राजाने उत्तर दिले, “नाही, माझ्या पुत्रा, आम्ही सर्वांनीच जाऊ नये; आम्ही तुझ्यासाठी केवळ भार होऊ.” जरी अबशालोमाने त्याला आग्रह केला, तरीही राजाने जाण्यास नकार दिला परंतु त्याने त्याला आशीर्वाद दिला.
२६
तेव्हा अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही, तर माझा भाऊ अम्नोन याला आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुमच्याबरोबर का जावे?”
२७
परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले.
२८
अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”
२९
तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले.
३०
ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.”
३१
तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले.
३२
परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता.
३३
माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.”
३४
तोपर्यंत अबशालोम पळून गेला होता. पहार्‍यावर असलेल्या मनुष्याने वर दृष्टी करून पाहिले आणि त्याला रस्त्याच्या पश्चिमेकडून डोंगरावरून खाली पुष्कळ लोक येताना दिसले. पहारेकर्‍याने जाऊन राजाला सांगितले, “होरोनाइमच्या दिशेकडे डोंगराच्या वरील बाजूला मला लोक दिसत आहेत.”
३५
योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.”
३६
त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले.
३७
अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
३८
अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला.
३९
आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options