मुख्य मजकुरावर जा

Women बद्दल बायबलमधील वचने: Fall of, and curse upon

18 वचने · 47 पैलू

Fall of, and curse upon बद्दल वचने

  1. आता याहवेह परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व वन्यप्राण्यांमध्ये सर्प सर्वात धूर्त होता. त्याने स्त्रीला म्हटले, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असे परमेश्वराने खरोखरच म्हटले आहे काय?”

  2. स्त्री सर्पाला म्हणाली, “आम्हाला बागेतील झाडांची फळे खाण्याची मुभा आहे.

  3. पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ”

  4. पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही,

  5. कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.”

  6. जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले.

  7. पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली.

  8. सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.

  9. परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?”

  10. आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”

  11. याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

  12. त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”

  13. तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.”

  14. याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून, “तू सर्व पाळीव प्राण्यांहून, आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस! तू तुझ्या पोटावर सरपटशील आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस माती खाशील.

  15. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”

  16. नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”

  17. परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.

  18. आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली.