मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने: Nehemiah

18 वचने · 5 पैलू

Nehemiah बद्दल वचने

  1. त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे.

  2. आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले.

  3. मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या.

  4. नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली.

  5. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  6. सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत.

  7. मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात?

  8. तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.”

  9. यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.

  10. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.

  11. पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही.

  12. नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा.

  13. याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता.

  14. त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे.

  15. तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही.

  16. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.

  17. आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?”

  18. मुख्य याजक एल्याशीबचा पुत्र यहोयादाच्या पुत्रांपैकी एकजण सनबल्लट होरोनी याचा जावई होता, म्हणून मी त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिले.