मत्तय १२:६-३०
६
मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे.
७
‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता.
८
कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”
९
नंतर ते तिथून निघाले आणि सभागृहामध्ये गेले.
१०
तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?”
११
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “समजा, तुमच्याजवळ एकच मेंढरू आहे आणि शब्बाथ दिवशी ते विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला धरून वर काढणार नाही काय?
१२
मग मेंढरापेक्षा मनुष्य कितीतरी पटीने अधिक मोलवान आहे! म्हणून शब्बाथ दिवशी नियमानुसार चांगले करणे योग्य आहे.”
१३
मग ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा अगदी चांगला झाला.
१४
परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली.
१५
परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्यांना बरे केले.
१६
त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका, अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली.
१७
या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी:
१८
“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो मला प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय जाहीर करेल.
१९
तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.
२०
जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.
२१
त्याच्या नावावर सर्व राष्ट्रे आपली आशा ठेवतील.”
२२
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले.
२३
तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?”
२४
परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.”
२५
त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही.
२६
जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?
२७
आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील.
२८
परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
२९
“किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
३०
“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.
Settings