मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती ४२:२९-३८

कनानला परतणे आणि याकोबाचे दुःख

उत्पत्ती ४२:२९-३८
२९
कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली.
३०
ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.”
३१
आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत.
३२
आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.”
३३
तेव्हा त्या देशाचा अधिपती आम्हाला म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक माणसे आहात की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी मी असे ठरविले आहे: तुमच्यापैकी एका भावाला येथे तुरुंगात ठेवावे; बाकीच्यांनी तुमच्या कुटुंबीयांसाठी धान्य घेऊन घरी जावे.
३४
पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार करू शकाल.”
३५
त्यांनी त्यांची धान्याची पोती रिकामी केली तो, प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांनी दिलेले पैसे होते असे त्यांना दिसून आले! भयाने त्यांचा व त्यांच्या वडिलांचाही थरकाप उडाला.
३६
मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.”
३७
तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.”
३८
पण याकोबाने उत्तर दिले, “माझा मुलगा तुमच्याबरोबर तिथे जाणार नाही; त्याचा भाऊ योसेफ मरण पावला आणि आता तो एकटाच राहिला आहे; त्याला काही कमीजास्त झाले तर या म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल!”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options