Skip to content
निर्गम २२:१०-३१

निर्गम २२:१०-३१

१०
“जर कोणी आपले गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर आपल्या शेजार्‍याकडे सुरक्षित राहावे म्हणून ठेवले आणि ते मेले किंवा त्याला काही इजा झाली किंवा त्याच्यावर नजर नसताना त्याला कोणी घेऊन गेले,
११
तर शेजार्‍याने दुसर्‍याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही.
१२
पण ते जनावर जर शेजार्‍याकडून चोरीला गेले, तर त्याने मालकाला भरपाई करून द्यावे.
१३
जर एखाद्या जंगली श्वापदाने ते जनावर फाडून टाकले, तर त्या शेजार्‍याने त्या जनावराचे पार्श्वशरीर पुरावा म्हणून समोर आणावे आणि त्या फाडलेल्या जनावराची फेड करून देऊ नये.
१४
“जर कोणी आपल्या शेजार्‍याकडून जनावर उसने घेतो व जनावराचा मालक तिथे नसताना ते जनावर जखमी झाले किंवा मेले, तर त्याने त्याची भरपाई त्याला द्यावी.
१५
पण मालक जनावराबरोबर असला, तर भाडेकरूने त्याची भरपाई करू नये. जर त्याने ते भाड्याने घेतले असेल, तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.
१६
“जर एखादा मनुष्य मागणी न झालेल्या कुमारीला भुलवितो आणि तिचा विनयभंग करतो, तर त्याने वधूकिंमत द्यावी आणि ती त्याची पत्नी होईल.
१७
पण जर तिच्या वडिलांनी ती त्याला देण्यास नाकारले, तरीही त्याने कुमारिकेची वधूकिंमत द्यावी.
१८
“चेटकिणीला मुळीच जिवंत राहू देऊ नये.
१९
“पशुशी लैंगिक संबंध करणार्‍याला अवश्य जिवे मारावे.
२०
“याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्‍यांचा नाश करून टाकावा.
२१
“परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.
२२
“विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.
२३
तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.
२४
मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.
२५
“तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.
२६
तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,
२७
कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे.
२८
“तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.
२९
“आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.
३०
बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे.
३१
“तुम्ही माझे पवित्र लोक असावे. यास्तव हिंस्र श्वापदाने मारून टाकलेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये; ते तुम्ही कुत्र्यांना घालावे.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options