Skip to content
निर्गम २:११-२२

निर्गम २:११-२२

११
मोशे तरुण झाल्यानंतर, एक दिवस तो आपल्या लोकांना भेटायला गेला असताना त्याने त्यांना कष्टाने राबत असताना बघितले. इजिप्तचा एक मनुष्य त्याच्या इब्री बांधवाला मारहाण करीत असल्याचे मोशेने पाहिले.
१२
आपल्याला कोणीही पाहत नाही, हे बघून त्याने त्या इजिप्ती मनुष्याला ठार केले आणि त्याला वाळूत लपवून टाकले.
१३
दुसर्‍या दिवशी तो बाहेर गेला आणि त्याला दोन इब्री पुरुष मारामारी करताना दिसले. तेव्हा ज्याची चूक होती त्याला तो म्हणाला, “तू आपल्या इब्री सोबत्याला का मारत आहेस?”
१४
तो मनुष्य त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले? तू इजिप्त देशाच्या मनुष्याला जसे मारून टाकलेस, तसे मलाही मारून टाकायचा तुझा विचार आहे काय?” तेव्हा मोशे घाबरला आणि त्याला वाटले, “मी जे काही केले ते सर्वांना माहीत झाले असणार.”
१५
जेव्हा फारोहने हे ऐकले, त्याने मोशेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोहपासून पळून मिद्यानास राहवयाला गेला, तिथे जाऊन तो एका विहिरीजवळ बसला.
१६
तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या.
१७
पण तिथे काही धनगर आले आणि त्यांनी मुलींना तिथून हाकलून लावले. पण मोशे उठला व मुलींच्या मदतीस आला आणि त्यांच्या मेंढरांना पाणी पाजले.
१८
जेव्हा मुली आपले वडील रऊएल याकडे परत गेल्या, त्याने त्यांना विचारले, “आज इतक्या लवकर कशा आल्या?”
१९
त्यांनी उत्तर दिले, “एका इजिप्ती व्यक्तीने आम्हाला मेंढपाळांपासून सोडविले; त्याने आमच्यासाठी विहिरीतून पाणी सुद्धा काढले आणि मेंढरांना पाजले.”
२०
“तो कुठे आहे?” रऊएलाने आपल्या मुलींना विचारले, “त्याला तुम्ही का सोडून आला? काहीतरी खावे म्हणून त्याला आमंत्रण द्या.”
२१
मोशेने त्या मनुष्यासह राहण्यास स्वीकारले. त्याने आपली मुलगी सिप्पोराह हिला मोशेची पत्नी म्हणून दिली.
२२
सिप्पोराने एका मुलाला जन्म दिला आणि मोशेने त्याचे नाव गेर्षोम ठेवले, कारण मोशे म्हणाला, “मी विदेशात एक परदेशी झालो आहे.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options