2 शमुवेल १४:१७-३२
१७
“आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ”
१८
तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.”
१९
राजाने विचारले, “या सर्व गोष्टींमध्ये योआबाचा हात नाही काय?” त्या स्त्रीने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाच्या जीविताची शपथ, माझे धनीराजा जे सांगतात त्यापासून कोणीही उजवी किंवा डावीकडे वळू शकत नाही. होय, तो आपला सेवक योआब होता ज्याने मला हे करण्यास सुचविले व आपल्या सेविकेच्या मुखात शब्द घातले.
२०
आपला सेवक योआब याने सध्याची परिस्थिती बदलावी म्हणून असे केले. माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूताप्रमाणे ज्ञान आहे; देशात जे काही घडते ते सर्व आपणास ठाऊक आहे.”
२१
तेव्हा राजाने योआबाला म्हटले, “ठीक आहे, मी त्याप्रमाणे करेन, जा आणि त्या तरुण अबशालोमास परत घेऊन ये.”
२२
योआबाने राजाला सन्मान व आशीर्वाद देण्यासाठी भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. योआब म्हणाला, “आज आपल्या सेवकास समजले की त्याच्या धनीराजाच्या नजरेत तो कृपा पावला आहे, कारण राजाने आपल्या सेवकाची विनंती मान्य केली आहे.”
२३
मग योआबाने गशूरला जाऊन अबशालोमला यरुशलेमास परत आणले.
२४
तेव्हा राजाने म्हटले, “त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे, त्याने माझे मुख पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहिला व त्याने राजाचे मुख पाहिले नाही.
२५
सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता.
२६
वर्षातून एकदा तो आपल्या डोक्यावरील केस कापत असे कारण ते त्याच्यासाठी फार भारी होत असत. जेव्हा तो केस कापीत असे; त्याचे वजन केले जात असे, आणि राजकीय मापानुसार त्याचे वजन दोनशे शेकेल इतके भरत असे.
२७
अबशालोमास तीन पुत्र व एक कन्या झाली. त्याच्या कन्येचे नाव तामार होते. ती फार सुंदर होती.
२८
अबशालोम यरुशलेमात राजाचे मुख न पाहता दोन वर्षे राहिला.
२९
तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला.
३०
तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली.
३१
नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?”
३२
अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings