2 शमुवेल १४:१२-२०
१२
तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” राजाने म्हटले, “बोल,”
१३
ती स्त्री म्हणाली, “तर मग परमेश्वराच्या लोकांविरुद्ध आपण अशी योजना का केली? जेव्हा राजा असे म्हणतो, कारण राजाने स्वतः घालवून दिलेल्या आपल्याच मुलाला परत आणले नाही, तेव्हा तो स्वतःलाच दोषी ठरवीत नाही का?
१४
जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात.
१५
“आणि आता मी माझ्या धनीराजाला हे सांगण्यासाठी आले आहे, कारण लोकांनी मला भयभीत केले आहे. आपल्या सेविकेने विचार केला, ‘मी राजाशी बोलेन; कदाचित ते आपल्या सेविकेची विनंती मान्य करतील.
१६
कदाचित, राजा त्यांच्या सेविकेला त्या माणसाच्या हातून सोडविण्यास मान्य होतील, जो मला आणि माझ्या मुलाला परमेश्वराच्या वतनापासून वंचित ठेवेल.’
१७
“आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ”
१८
तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.”
१९
राजाने विचारले, “या सर्व गोष्टींमध्ये योआबाचा हात नाही काय?” त्या स्त्रीने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाच्या जीविताची शपथ, माझे धनीराजा जे सांगतात त्यापासून कोणीही उजवी किंवा डावीकडे वळू शकत नाही. होय, तो आपला सेवक योआब होता ज्याने मला हे करण्यास सुचविले व आपल्या सेविकेच्या मुखात शब्द घातले.
२०
आपला सेवक योआब याने सध्याची परिस्थिती बदलावी म्हणून असे केले. माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूताप्रमाणे ज्ञान आहे; देशात जे काही घडते ते सर्व आपणास ठाऊक आहे.”
Settings