Skip to content
1 करिंथकरांस १४:६-२५

1 करिंथकरांस १४:६-२५

बंधू व भगिनींनो, समजा मी तुमच्याकडे आलो आणि अन्य भाषेत बोलू लागलो, तर तुम्हाला माझा काय फायदा, याउलट मी तुमच्यासाठी काही प्रकटीकरण, किंवा ज्ञान किंवा संदेश दिला किंवा वचनाचा बोध आणला तर चांगले होणार नाही का?
बासरी किंवा वीणा यांसारख्या निर्जीव वस्तू ध्वनी उत्पन्न करतात, परंतु प्रत्येक वाद्याच्या स्वरात भिन्नता असल्याशिवाय कोणते वाद्य वाजत आहे हे कसे समजणार?
जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?
तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्‍याबरोबर बोलत आहात असे होईल.
१०
निःसंशय जगामध्ये निरनिराळ्या भाषा आहेत, परंतु एकही अर्थाविना नाही.
११
जर मला एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नाही, तर माझ्याशी बोलणारा मनुष्य मला विदेशी वाटेल आणि मीही त्याला विदेशी वाटेन.
१२
तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा.
१३
या कारणासाठी एखादा अन्य भाषेत बोलतो, तर त्याने आपण काय बोललो याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
१४
कारण मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझे मन निष्फळ आहे.
१५
मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन.
१६
जेव्हा तुम्ही फक्त आत्म्याने परमेश्वराची उपकारस्तुती कराल, तर जो चौकशी करणारा किंवा अविश्वासू व्यक्ती, ज्याला तुम्ही काय बोलता हे समजत नाही तो तुमच्या स्तुतीला “आमेन” कसा म्हणू शकेल?
१७
तुम्ही पुरेशी स्तुती करता, परंतु याद्वारे कोणाचीच उन्नती होणार नाही.
१८
मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषेत बोलू शकतो, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.
१९
परंतु मंडळीत अन्य भाषेतून दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, इतरांना बोध होईल असे पाच शब्द बोलणे मी अधिक पसंत करेन.
२०
प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा.
२१
नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे: “अन्य भाषा बोलणारे परक्यांच्या ओठांद्वारे मी या लोकांशी बोलेल, परंतु तरीही हे लोक माझे ऐकणार नाहीत. असे प्रभू म्हणतात.”
२२
अन्य भाषा बोलता येणे ही विश्वास ठेवणार्‍यांसाठी चिन्ह नसून, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्ह आहे. परंतु संदेश देणे, हे विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नाही.
२३
तरीपण चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य तुमच्या मंडळीत आला आणि त्याने तुम्हा सर्वांना अन्य भाषेतून बोलताना ऐकले, तर तुम्ही सर्वजण वेडे आहात असेच त्याला वाटेल.
२४
परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील.
२५
त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options