Skip to content

Holy Boldness बद्दल बायबलमधील वचने

23 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला.

  2. अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय?

  3. जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय?

  4. ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”

  5. याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.”

  6. मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे,

  7. जर नीतिमानांची संख्या पाच कमी पन्नास असली तर काय? पाच लोक कमी आहेत म्हणून तुम्ही त्या संपूर्ण शहराचा नाश करणार काय?” याहवेहने उत्तर दिले “मला तिथे पंचेचाळीस भेटले, तरी मी त्याचा नाश करणार नाही.”

  8. अब्राहाम पुन्हा याहवेहला म्हणाला, “तिथे फक्त चाळीस असले तर काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्या चाळिसांसाठी, मी नाश करणार नाही.”

  9. मग तो म्हणाला, “प्रभूला राग येऊ नये, पण मला बोलू द्यावे. फक्त तीसच मिळाले तर?” याहवेहने उत्तर दिले, “तिथे तीस सापडले, तरी मी नाश करणार नाही.”

  10. मग अब्राहाम म्हणाला, “मी प्रभूशी बोलण्याचे खूप धैर्य केले आहे, तिथे जर वीसच नीतिमान लोक असले तर?” त्यांनी म्हटले, “त्या विसांसाठी मी त्यांचा नाश करणार नाही.”

  11. मग तो म्हणाला, “प्रभूला राग न येवो, पण मला एकदाच बोलू द्यावे. तिथे फक्त दहाच सापडले तर?” याहवेहने उत्तर दिले, “त्या दहांच्यासाठी मी त्याचा नाश करणार नाही.”

  12. तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली.

  13. याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला.

  14. मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.”

  15. मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.”

  16. यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”

  17. मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.

  18. नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो!

  19. या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण चौकशी करीत असाल,

  20. तर मला तुम्हाला आणि सर्व इस्राएली लोकांना सांगू द्या की, ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर चढवून ठार मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुनः उठविले, त्याच नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य येथे पूर्ण बरा होऊन तुमच्यासमोर उभा आहे.”

  21. धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’

  22. तारण दुसर्‍या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”

  23. त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते.