God
God चा उल्लेख असलेली वचने
“माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय? जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.” असे याहवेह जाहीर करतात. मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय? असे याहवेह जाहीर करतात.
“माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’
त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात.
ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात.
याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्या हातोडीसारखे ते नाही काय?
“जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात.
होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे.
जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
“या लोकांपैकी, या संदेष्ट्यांपैकी, किंवा याजकांपैकी कोणी तुला विचारेल, ‘अरे यिर्मयाह, आज याहवेहकडून काय संदेश आहे?’ तेव्हा तू त्यांना असे उत्तर द्यावेस, ‘कसला संदेश? मी तुम्हाला दूर लोटून टाकणार आहे, असे याहवेह जाहीर करतात.’
आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन.
तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’
परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता.
तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’
‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता.
म्हणून मी निश्चितच तुम्हाला विसरेन आणि तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या शहराला माझ्या समक्षतेतून घालवून देईन.
मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.”
बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.
तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.”
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे.
त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही.
मी त्यांना असे अंतःकरण देईन जेणेकरून ते मला ओळखतील, की मीच याहवेह आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा परमेश्वर होईन, कारण ते पूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत येतील.
“ ‘परंतु नासके अंजीर जे इतके नासके आहेत की ते खाण्यायोग्य नाहीत, हे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी व या देशात उरलेले यरुशलेमचे सर्व लोक यांचे प्रतीक आहेत; मग ते यरुशलेमचे अवशिष्ट लोक असोत वा इजिप्तमध्ये वस्ती करून राहिलेले असोत, याहवेह म्हणतात.
मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शाप आणि ते उपहासाचा विषय होतील.
त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ”