Skip to content

1 इतिहास१३

दावीद कराराचा कोश आणण्याची योजना करतो

१
दावीदाने आपल्या सेनाधिकार्‍यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला.
२
जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या.
३
त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.”
४
तेव्हा संपूर्ण सभेने एकमताने होकार दिला व सर्व लोकांना ते योग्य वाटले.

मिरवणुकीचा प्रारंभ

५
मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.
६
दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे, जो त्या नावाने संबोधित केला जातो, सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत, तो आणण्यासाठी निघाले.
७
त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.
८
दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.

उज्जाला शिक्षा झाली

९
जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.
१०
त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला.
११
तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.

कराराचा कोश ओबेद-अदोमकडे राहिला

१२
त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?”
१३
त्याने कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात नेला नाही. त्याऐवजी त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.
१४
परमेश्वराचा कोश ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याच्या घराण्यास व त्याचे जे काही होते त्या सर्वास आशीर्वाद दिला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options