Skip to content
रोमकरांस १५:१४-३२

रोमकरांस १५:१४-३२

१४
माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही स्वतः चांगुलपणाने पूर्ण भरलेले व ज्ञानाने परिपूर्ण आणि एकमेकांना शिकवण्यास पात्र आहात याची मला नक्कीच खात्री आहे.
१५
त्यांची तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मी काही गोष्टींबद्दल धीटपणे लिहिले आहे, कारण परमेश्वराने मला कृपा दिली आहे
१६
की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.
१७
यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो.
१८
गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही.
१९
चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.
२०
जिथे ख्रिस्ताबद्दल अजून कळले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवार्तेचा प्रचार करावा हेच माझे ध्येय होते, यासाठी की मी इतरांनी बांधलेल्या पायावर रचू नये.
२१
यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.”
२२
यामुळे तुम्हाकडे येण्यास मला अनेकदा अडखळण आले.
२३
पण आता या प्रांतामध्ये मला काही काम करावयाचे राहिले नाही, आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्याकडे येण्यास मी तयार झालो आहे.
२४
कारण स्पेन देशाची सफर करण्याचा माझा मानस आहे. तिकडे जाताना आशा आहे की मी काही काळ तुमच्या सहवासात आनंदाने घालविल्यावर, तुम्ही मला पुन्हा वाटेस लावावे.
२५
आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे.
२६
कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे.
२७
हे त्यांनी अतिशय आनंदाने केले. आपण ॠणी आहोत असे त्यांना वाटते. गैरयहूदीयांना यहूदीयांद्वारे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत, या अद्भुत आध्यात्मिक दानाची अंशतः फेड म्हणून हे भौतिक दान द्यावे, असे त्यांनी ठरविले.
२८
ही वर्गणी पोहोचवून त्यांचे हे काम पार पाडल्यानंतर आणि दान त्यांना मिळाल्याची खात्री झाल्यानंतर मी स्पेनकडे जाताना तुम्हाला येऊन भेटेन;
२९
आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे.
३०
बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी.
३१
यहूदीयामधील जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यापासून माझे रक्षण व्हावे आणि मी नेत असलेली वर्गणी यरुशलेम येथील प्रभूच्या लोकांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करा.
३२
मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options