मुख्य मजकुरावर जा
यहोशुआ २२:१३-२०

इस्राएल प्रतिनिधीमंडळ पाठवतो

यहोशुआ २२:१३-२०
१३
म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.
१४
त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.
१५
जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:
१६
“याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता?
१७
पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही.
१८
आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.
१९
जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.
२०
जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options