योहान ८:१४-३८
१४
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो, तरी माझी साक्ष सबळ आहे, कारण मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे, हे मला माहीत आहे. परंतु मी कुठून येतो व मी कुठे जातो याची तुम्हाला काही कल्पना नाही.
१५
तुम्ही मानवी मापदंडाने न्याय करता; परंतु मी कोणाचाही न्याय करीत नाही.
१६
मी न्याय केलाच, तर माझे निर्णय खरे आहेत, कारण मी एकटाच नाही, तर ज्या पित्याने मला पाठविले तेही माझ्याबरोबर असतात.
१७
तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की दोन साक्षीदारांची साक्ष खरी मानावी.
१८
मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठविले ते माझे दुसरे साक्षीदार आहेत.”
१९
तेव्हा त्यांनी विचारले, “तुझा पिता कुठे आहे?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी व माझा पिता कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
२०
मंदिराच्या अंगणाच्या जवळ जिथे दानार्पण टाकीत असत तिथे शिकवीत असताना ते ही वचने बोलले, तरीसुद्धा त्यांना कोणीही धरले नाही, कारण त्यांची वेळ तेव्हापर्यंत आली नव्हती.
२१
मग पुन्हा येशू त्यांना म्हणाले, “मी जाणार आहे आणि तुम्ही माझा शोध कराल व तुमच्या पापात मराल. मी जिथे जाणार तिथे तुम्हाला येता येणार नाही.”
२२
यामुळे यहूदी म्हणू लागले, “ ‘मी जिथे जातो, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ म्हणजे तो आत्महत्या करेल की काय?”
२३
परंतु ते पुढे म्हणाले, “तुम्ही खालचे आहात; मी तर वरून आहे. तुम्ही या जगाचे आहात; तसा मी या जगाचा नाही.
२४
मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.”
२५
त्यांनी विचारले, “तर मग आपण कोण आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी प्रारंभापासून तुम्हाला सांगत आलो आहे,
२६
मला तुमचा न्याय करण्याबाबत बरेच काही बोलायचे आहे. परंतु ज्यांनी मला पाठविले, ते विश्वसनीय आहेत आणि जे मी त्यांच्यापासून ऐकले आहे, तेच जगाला सांगतो.”
२७
परंतु ते त्यांच्याशी पित्यासंबंधी बोलत होते, हे त्यांना अद्यापि उमगले नव्हते.
२८
म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल, तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्यागोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल.
२९
ज्याने मला पाठविले; ते माझ्याबरोबर आहेत, त्यांनी मला एकटे सोडले नाही, कारण त्यांना जे आवडते ते मी नेहमी करत असतो.”
३०
हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
३१
ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.
३२
मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल.”
३३
त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?”
३४
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे.
३५
आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तिथे सदासर्वदा राहतो.
३६
म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.
३७
मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही.
३८
मी पित्याच्या समक्षतेत असताना जे पाहिले, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मात्र तुमच्या पित्यापासून जे काही ऐकले त्याप्रमाणे करता.”
Settings