उत्पत्ती ४९:२०-३३
२०
“आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.
२१
“नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.
२२
“योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.
२३
कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.
२४
परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.
२५
कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्या झर्यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.
२६
तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.
२७
“बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”
२८
हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.
२९
नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.
३०
कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.
३१
तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.
३२
ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”
३३
आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.
Settings