उत्पत्ती ४२:९-२५
९
यावेळी योसेफाला आपल्याला पूर्वी पडलेल्या स्वप्नांची आठवण झाली, आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! आणि आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आला आहात.”
१०
ते म्हणाले, “नाही, नाही महाराज, आपले सेवक फक्त धान्य खरेदीसाठी आले आहेत.
११
आम्ही भाऊ एकाच पित्याचे पुत्र आहोत, तुमचे सेवक प्रामाणिक पुरुष आहेत, आम्ही हेर नाही.”
१२
“नाही,” तो त्यांना म्हणाला, “आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठीच तुम्ही आला आहात.”
१३
परंतु ते म्हणाले, “महाराज, आपले हे सेवक बारा भाऊ आहेत; एकाच पित्याचे पुत्र आहोत, जे कनान देशात आहेत; आमचा धाकटा भाऊ आमच्या पित्यासोबत आहे आणि आमचा एक भाऊ आता जीवित नाही.”
१४
योसेफ म्हणाला, “म्हणूनच मी म्हणतो: तुम्ही हेर आहात!
१५
आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही.
१६
तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!”
१७
आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले.
१८
तिसर्या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे.
१९
तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या.
२०
परंतु तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या. अशा रीतीने तुमचे शब्द खरे होतील आणि तुमचा मृत्यू टळेल.” मग त्यांनी तेच केले.
२१
ते एकमेकांना म्हणाले, “आम्ही आमच्या भावाविषयी दोषी आहोत. जेव्हा त्याने आपल्या जिवाची विनवणी केली तेव्हा तो किती व्यथित होता हे आम्ही पाहिले, पण आम्ही ऐकले नाही; त्यामुळेच हे संकट आमच्यावर आले आहे.”
२२
रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.”
२३
योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता.
२४
तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले.
२५
नंतर योसेफाने आपल्या नोकरांना त्यांची पोती धान्याने भरण्यास सांगितले; पण त्याचवेळी त्याने प्रत्येक भावाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या पोत्यात ठेवून द्यावे अशी सूचना दिली. त्याने आपल्या भावांना प्रवासासाठी अन्नसामुग्री देण्याचा आदेश दिला.
Settings