अनुवाद ३:१-१०
१
मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.
२
याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”
३
याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही.
४
त्याची सगळी शहरे आम्ही त्यावेळी घेतली होती. अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आणि बाशानमधील ओगचे राज्य, साठ नगरातील असे एकही शहर राहिले नाही जे आम्ही त्यांच्याकडून घेतले नाही.
५
या सर्व शहरांच्या तटबंदी उंच व दरवाजे लोखंडी गजांचे होते. शिवाय बरीच तटबंदी नसलेली गावेही होती.
६
ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला.
७
पण त्यांची सर्व गुरे व शहरातून मिळालेली लूट आपण आपल्यासाठी नेली.
८
म्हणून आपल्या ताब्यात दोन्हीही राजांचे सर्व प्रदेश, म्हणजे यार्देनेच्या पूर्वेकडे आर्णोन खिंडीपर्यंत असलेला हर्मोन पर्वतापर्यंतचा अमोर्यांचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आला.
९
(सीदोनी लोक हर्मोन पर्वतास सिर्योन असेही म्हणत, पण अमोरी लोक त्याला सनीर म्हणत असत.)
१०
आतापर्यंत आपण पठारावरील सर्व शहरे, संपूर्ण गिलआद आणि बाशान, सलेकाह व एद्रेई, ओग या शहरांपर्यंतची सर्व शहरे काबीज केली.
Settings