कलस्सैकरांस १:१-२५
१
परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल व बंधू तीमथ्य यांच्याकडून,
२
कलस्सै शहरातील पवित्र लोक व ख्रिस्तामधील विश्वासू बंधू व भगिनीस,
३
आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो त्यावेळी परमेश्वराचे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे सतत आभार मानतो,
४
कारण ख्रिस्त येशूंमध्ये असलेला तुमचा विश्वास, आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले आहे.
५
विश्वास व प्रीती यामुळे निर्माण होणारी आशा जी स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवली आहे व ज्याबद्दल तुम्ही शुभवार्तेच्या सत्याचा संदेश आधी ऐकला आहे,
६
ज्या दिवसापासून तुम्ही ती शुभवार्ता ऐकली व परमेश्वराची कृपा तुम्हाला त्याद्वारे समजून आली व तुमच्यामध्येही ती वाढत आहे, त्याचप्रमाणे ती आता जगभर वृद्धिंगत होऊन फळ देत आहे.
७
आमचा अतिप्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही शिकला, तो आमच्यावतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे.
८
पवित्र आत्म्यामध्ये तुमची प्रीती याबद्दलही त्यानेच आम्हाला सांगितले.
९
म्हणूनच आम्ही ज्या दिवशी तुमच्याविषयी ऐकले, तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही परमेश्वराजवळ सतत मागतो की त्यांनी तुम्हाला आत्म्याद्वारे दिले जाणारे सर्व ज्ञान व समज यांच्याद्वारे त्यांच्या इच्छेच्या ज्ञानाने भरावे;
१०
त्यामुळे प्रभूला आवडेल असे योग्य जीवन तुम्ही जगावे व प्रत्येक बाबतीत त्यांना प्रसन्न करावे. चांगल्या कृत्यांद्वारे फळ देणारे, परमेश्वराच्या ज्ञानात वाढणारे,
११
धीर व सहनशक्ती ही अधिक रीतीने तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्वप्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि आनंदाने
१२
त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे.
१३
कारण अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,
१४
त्यांच्यामध्ये आपणास खंडणी, अर्थात् पापांची क्षमा मिळाली आहे.
१५
त्यांचा पुत्र हे अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहेत, सर्व सृष्टीत प्रथम जन्मलेले आहेत.
१६
त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी निर्माण झाल्या: स्वर्गातील गोष्टी आणि पृथ्वीवरील, दृश्य आणि अदृश्य, मग ती सिंहासने किंवा अधिपत्य किंवा शासक किंवा अधिकारी असोत, प्रत्येक गोष्ट त्यांच्याद्वारे व त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे.
१७
ते सर्व गोष्टींच्या पूर्वी आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी स्थिर राहतात,
१८
आणि ते शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहेत, तेच प्रारंभ आहेत; आणि तेच मेलेल्यामधून प्रथम जन्मलेले आहेत, यासाठी की ते प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी सर्वश्रेष्ठ असावे.
१९
कारण परमेश्वराची प्रसन्नता यामध्येच होती की, त्यांची सर्व परिपूर्णता येशूंच्या ठायी वसावी,
२०
आणि त्यांच्या क्रूसावरील सांडलेल्या रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून स्वर्गात व पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा त्यांच्याद्वारे समेट व्हावा.
२१
एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता.
२२
परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक दोषरहित सादर करावे;
२३
जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, मी पौल, त्या शुभवार्तेचा सेवक झालो आहे.
२४
आता तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंद आहे; कारण ख्रिस्ताने, त्यांचे शरीर म्हणजे मंडळी हिच्याकरिता सोसलेल्या दुःखातले जे अद्यापि अपूर्ण राहिलेले आहे, ते मी माझ्या शरीरामध्ये भरून काढत आहे.
२५
तुम्हाला परमेश्वराचे वचन पूर्णतेने कळावे व ते सादर करता यावे म्हणून मी तिचा सेवक झालो असून माझी नेमणूक करण्यात आली आहे.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings