2 शमुवेल १५:१-१२
१
त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.
२
तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.”
३
तेव्हा अबशालोम त्याला म्हणत असे, “पाहा, तुझे दावे कायदेशीर आणि यथायोग्य आहेत, परंतु तुझे ऐकण्यासाठी राजाचा कोणीही प्रतिनिधी तिथे नाही.”
४
अबशालोम आणखी असेही म्हणे, “जर या देशात न्यायाधीश म्हणून माझी नेमणूक झाली! तर प्रत्येकजण ज्याची काही तक्रार किंवा खटला आहे तो माझ्याकडे आला असता व मी त्यांना न्याय मिळवून दिला असता.”
५
जेव्हा कोणी खाली लवून मुजरा करावयाला जवळ आला, तेव्हा अबशालोम पुढे जाऊन त्याचा हात पकडून त्याचे चुंबन घेत असे.
६
जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली.
७
चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.
८
आपला सेवक अराम येथील गशूर या ठिकाणी राहत असताना मी हा नवस केला होता: ‘जर याहवेह मला परत यरुशलेमास घेऊन जातील, तर मी हेब्रोन येथे याहवेहची उपासना करेन.’ ”
९
राजा त्याला म्हणाला, “शांतीने जा.” तेव्हा तो हेब्रोनकडे गेला.
१०
नंतर अबशालोमने इस्राएलच्या सर्व गोत्रांकडे गुप्त संदेशवाहक असे सांगत पाठवले, “रणशिंगांचा आवाज ऐकताच तुम्ही म्हणा, ‘हेब्रोनमध्ये अबशालोम राजा आहे.’ ”
११
यरुशलेममधून दोनशे लोक अबशालोमबरोबर आले होते. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते अगदी निरागसपणे गेले, त्यांना याबाबतीत काहीही माहीत नव्हते.
१२
अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.
Settings