2 इतिहास २८:१३-२७
१३
ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.”
१४
त्यामुळे शिपायांनी अधिकारी आणि जमलेल्या सर्व मंडळीच्या उपस्थितीत लूट आणि कैदींना सोडून दिले.
१५
ज्या माणसांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांनी कैद्यांना घेतले आणि जे वस्त्रहीन होते त्या सर्वांना कपडे घातले. त्यांनी त्यांना कपडे आणि पायताणे, अन्न आणि पेय आणि बरे होण्यासाठी मलम हे सर्व दिले. जे अशक्त होते त्या सर्वांना त्यांनी गाढवावर बसविले. तेव्हा ते त्यांना त्यांच्या इस्राएली बांधवांकडे यरीहो, खजुरीचे नगर येथे घेऊन गेले आणि ते शोमरोनकडे परत आले.
१६
त्यावेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदतीसाठी बोलाविणे पाठविले होते.
१७
एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले.
१८
त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.
१९
इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला.
२०
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला.
२१
आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
२२
त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.
२३
त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.
२४
आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातील इतर वस्तू एकत्र केल्या आणि कापून त्याचे तुकडे केले. त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि यरुशलेममधील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात वेद्या बसविल्या.
२५
यहूदीयामधील प्रत्येक गावात त्याने इतर दैवतांना बलिदाने अर्पिण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि याहवेहच्या, त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वराच्या रागाला चेतावणी दिली.
२६
त्याच्या राज्यकाळातील इतर घटना आणि त्याचे सर्व मार्ग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
२७
आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings