1 शमुवेल २३:१-१३
१
जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.”
२
तेव्हा त्याने याहवेहला विचारले, “मी तिकडे जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” याहवेहने दावीदाला उत्तर दिले, “जा, पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाहला वाचव.”
३
परंतु दावीदाची माणसे त्याला म्हणाली, “येथे यहूदीयाच्या प्रदेशामध्ये असतानाच आम्हाला भीती वाटते, जर कईलाहकडे जाऊन आम्ही पलिष्ट्यांच्या सैन्याविरुद्ध गेलो तर किती अधिक धोका असेल!”
४
दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.”
५
तेव्हा दावीद आणि त्याची माणसे कईलाहकडे गेली, पलिष्ट्यांशी लढले आणि त्यांची गुरे नेली. त्याने पलिष्टी लोकांचे मोठे नुकसान केले आणि कईलाहच्या लोकांना वाचविले.
६
(आता अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार दावीदाकडे कईलाह येथे पळून येताना त्याने आपल्याबरोबर एफोद आणला होता.)
७
शौलाला कोणी सांगितले की, दावीद कईलाह येथे गेला आहे आणि तो म्हणाला, “परमेश्वराने त्याला माझ्या हाती दिले आहे, कारण ज्या नगरास वेशी व भिंती आहेत त्यात जाऊन दावीदाने स्वतःला कैद करून घेतले आहे.”
८
तेव्हा कईलाहास जाऊन दावीदाला व त्याच्या माणसांना वेढावे म्हणून शौलाने त्याच्या संपूर्ण सैन्याला युद्धासाठी बोलाविले.
९
जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.”
१०
दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे.
११
कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”
१२
पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.”
१३
तेव्हा दावीद आणि त्याची सुमारे सहाशे माणसे यांनी कईलाह सोडले आणि ते ठिकठिकाणी फिरत राहिले. जेव्हा शौलाला सांगण्यात आले की, दावीद कईलाहतून निसटून गेला आहे, तो तिकडे गेला नाही.
Settings