The Deluge बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले.
आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या.
म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.”
परमेश्वराच्या दृष्टीने पृथ्वी पापाने भ्रष्ट झालेली आणि हिंसाचाराने पूर्णपणे भरलेली होती.
जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले.
तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, “मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे.
परंतु मी तुझ्यासोबत करार स्थापित करेन—तू आणि तुझे पुत्र आणि तुझी पत्नी व तुझ्या पुत्रांच्या पत्नी हे तारवात प्रवेश करतील.
तू प्रत्येक जातीचे दोन-दोन पशू, एक नर व एक मादी, अशा जोड्या जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात घेऊन ये.
प्रत्येक प्रकारचे पक्षी, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्रत्येकी दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील.
आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.”
परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.
“आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो.
तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो.
यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो.”
आणि परमेश्वर म्हणाले, “माझ्या आणि तुझ्यामध्ये व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत आहेत त्यांच्यामध्ये सर्वकाळाच्या पिढ्यांपर्यंत जो करार मी करतो त्याची खूण हीच आहे:
पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह म्हणून माझे मेघधनुष्य मी मेघात ठेवले आहे
ज्यावेळी मी पृथ्वीवर मेघ आणेन, त्यावेळी हे धनुष्य मेघांत प्रगट होईल.
आणि पृथ्वीवर पुन्हा जलप्रलय येणार नाही आणि सर्व प्राणिमात्रांचा नाश होणार नाही, तुमच्याशी आणि प्रत्येक प्राण्याशी केलेल्या या कराराची मला आठवण होईल.
जेव्हा मी ते धनुष्य मेघांमध्ये पाहीन, तेव्हा परमेश्वर आणि पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राशी केलेल्या सार्वकालिक कराराची मला आठवण होईल.”
परमेश्वर नोआहस म्हणाले, “पृथ्वीवरील सर्व सजीव व माझ्याबरोबर स्थापित झालेल्या कराराचे हे चिन्ह असेल.”
पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते त्यावर अजून किती काळ तू चालशील?
ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्या आधी उठविले गेले, त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला.
ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’
“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे.
जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल.