Skip to content

Ruth बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर,

  2. जेव्हा नाओमीने मोआब येथे ऐकले की, याहवेह त्यांच्या लोकांच्या मदतीला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा केला आहे, तेव्हा तिने आणि तिच्या सुनांनी त्यांच्या घराकडे परत जाण्याची तयारी केली.

  3. ती ज्या ठिकाणी राहत होती ते तिने सोडले आणि तिच्या दोन सुनांना घेऊन ती त्या मार्गाने निघाली जो त्यांना परत यहूदीया देशाकडे नेत होता.

  4. नंतर नाओमी तिच्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघीही तुमच्या आईच्या घरी परत जा. जशी तुम्ही तुमच्या मृत पतींवर आणि माझ्यावर दया दाखविली तशीच याहवेह तुमच्यावर दया करो.

  5. याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” नंतर तिने त्यांचे चुंबन घेतले आणि त्या मोठ्याने रडू लागल्या

  6. आणि तिला म्हणाल्या, “आम्हीही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे परत जाऊ.”

  7. परंतु नाओमी म्हणाली, “माझ्या मुलींनो, तुम्ही घरी परत जा. तुम्ही माझ्याबरोबर का यावे? मला आणखी पुत्र होणार आहेत काय, की ते तुमचे पती होऊ शकतील?

  8. माझ्या मुलींनो, तुमच्या घरी परत जा; मी इतकी वृद्ध झाले आहे की मी दुसरा पती करू शकत नाही. समजा, मी तसा विचार केला तरी माझ्यासाठी आशा होती—जरी आज रात्री माझा नवरा असता आणि नंतर मी पुत्रांना जन्म दिला असता—

  9. तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही वाट पाहत राहणार काय? नाही, माझ्या मुलींनो, तुमच्यापेक्षा मला हे फारच मोठे दुःख आहे, कारण याहवेहचा हात माझ्याविरुद्ध झाला आहे!”

  10. त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली.

  11. तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.”

  12. परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील.

  13. तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.”

  14. जेव्हा नाओमीने हे पाहिले की, रूथने तिच्याबरोबर जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, तेव्हा तिने तिला आग्रह करण्याचे थांबविले.

  15. त्या दोन्ही स्त्रिया बेथलेहेम येईपर्यंत चालत राहिल्या. जेव्हा त्या बेथलेहेम येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यामुळे ते संपूर्ण नगर गोंधळून गेले आणि स्त्रियांनी आश्चर्याने उद्गार काढले, “ही खरोखरच नाओमी आहे काय?”

  16. अशाप्रकारे नाओमी, तिची मोआबी सून रूथबरोबर मोआब देशातून परत आली, त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या, त्यावेळी सातूचा हंगाम सुरू झाला होता.

  17. तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता.

  18. त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”

  19. बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?”

  20. त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे.

  21. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्‍यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.”

  22. तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा.

  23. ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.”

  24. त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?”

  25. बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही.