Skip to content

Penitent बद्दल बायबलमधील वचने: Promises to

131 वचने · 1 पैलू

Promises to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  2. ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,

  3. तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.

  4. “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे.

  5. त्यांनी केलेले पाप कबूल करावे. त्यांनी केलेल्या पापाची पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यात त्याचा पाचवा भाग मिळवून ज्या व्यक्तीविरुद्ध पाप केला आहे त्याला द्यावा.

  6. परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.

  7. तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.

  8. कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.

  9. त्यांचे अंतःकरण मजविषयी नेहमीच असे राहिले आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे भय त्यांच्याठायी नेहमीच राहिले तर किती बरे होईल! असे झाल्यास त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे सदासर्वकाळ कल्याण होईल!

  10. मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या,

  11. आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,

  12. तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमची बंदिवासातून सुटका करतील आणि ते तुमच्यावर दया करतील आणि ज्या देशात त्यांनी तुम्हाला पांगवून टाकले असेल, त्या देशातून तुम्हाला एकत्र करतील.

  13. तुम्ही पृथ्वीच्या अगदी दिगंतापर्यंत विखुरलेले असला, तरी याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तिथून पुन्हा परत आणतील.

  14. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात परत आणतील आणि तुम्ही तो ताब्यात घ्याल. ते तुमचे कल्याण करतील आणि तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्हाला अधिक संपन्न आणि बहुगुणित करतील.

  15. याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या व तुमच्या वंशजांच्या अंतःकरणाची सुंता करतील, तुम्ही त्यांच्यावर पूर्ण मनाने व आत्म्याने प्रीती कराल, मग याद्वारे तुम्ही जिवंत राहू शकाल.

  16. याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील.

  17. तुम्ही परत याहवेहच्या आज्ञा पाळाल आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या त्यांच्या सर्व आज्ञेचे तुम्ही पालन कराल.

  18. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला समृद्धी प्रदान करतील. ते तुम्हाला विपुल संतती, पुष्कळ गुरे आणि तुमच्या भूमीला अमाप पीक देतील. याहवेह तुमच्या पूर्वजांवर जसे प्रसन्न होते, तसेच तुमच्या कल्याणासाठी तुम्हावरही परत प्रसन्न होतील,

  19. जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल आणि नियमशास्त्राच्या या ग्रंथात याहवेह तुमच्या परमेश्वराने जे नियम व विधी दिले आहेत, त्या तुम्ही पाळाल व पूर्ण मनाने व आत्म्याने याहवेह तुमच्या परमेश्वराकडे माघारी वळाल, तर हे होईल.

  20. कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.

  21. “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.

  22. जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.

  23. जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,

  24. तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.

  25. मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्‍ये आनंद पावशील व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.