Borrowing Trouble बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे, किंवा काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी, किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय?
आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?
शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?
“आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत.
तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.
जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला अधिक विशेष पोशाख घालणार नाहीत काय?
म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका.
कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे.
परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.
म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.
येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.”
त्यांचे बोलणे ऐकून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
“तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.
खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत.
परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.