God
God चा उल्लेख असलेली वचने
पण याहवेहने आजपर्यंत तुम्हाला समजणारी अंतःकरणे किंवा पाहू शकणारे डोळे किंवा ऐकू शकणारे कान दिलेले नाहीत.
खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.”
आज तुम्ही सर्वजण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या उपस्थितीत उभे आहात—म्हणजे तुमचे पुढारी व तुमचे गोत्र, तुमचे वडील आणि अधिकारी आणि इस्राएलमधील इतर सर्व पुरुष,
याहवेह तुमच्या परमेश्वराशी करार करण्यासाठी येथे तुम्ही उभे आहात, तो करार याहवेह आज तुमच्यासोबत करीत आहेत आणि शपथपूर्वक त्यावर अशी मोहोर लावत आहेत की,
तुम्ही त्यांचे लोक आहात आणि तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रतिज्ञापूर्वक वचन दिल्याप्रमाणे याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत याची आज तुम्हाला खात्री करून द्यावयाची आहे.
तर आज याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर जे इस्राएली उभे आहेत व जे आज येथे नाहीत त्यांच्यासोबत देखील ते आहेत.
आज येथे उभा असणारा तुमच्यातील कोणताही पुरुष किंवा स्त्री, कूळ किंवा गोत्राचे हृदय याहवेह तुमच्या परमेश्वराला सोडून इतर राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करण्यासाठी त्यांच्याकडे वळणार नाही याबद्दल खबरदारी घ्या; हे कडू विषारी फळ आणि कडू दवणा देणार्या रोपट्याचे मूळ तुम्हामध्ये उगविणार नाही याबद्दल खबरदारी घ्या.
याहवेह अशा लोकांना क्षमा करण्यास कधीही तयार होणार नाहीत; त्यांचा कोप व क्रोधाग्नी त्यांच्याविरुद्ध भडकेल. या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्यांच्यावर कोसळतील आणि याहवेह त्यांचे नाव देखील या आकाशाच्या खालून नामशेष करून टाकतील.
याहवेह या मनुष्याला सर्व इस्राएली गोत्रातून वेगळे काढतील आणि कराराच्या या नियमशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेले सर्व शाप त्याच्यावर कोसळतील.
मग तुमची भावी पिढी, तुमची मुलेबाळे आणि दूरदेशातील परदेशी लोक, तुमच्या देशावर याहवेहने पाठविलेली पीडा आणि रोगराई पाहतील.
तुमचा संपूर्ण देश गंधक आणि क्षारयुक्त होऊन—पूर्णपणे जळून गेल्यामुळे ती एक निरुपयोगी भूमी झाली आहे असे त्यांना आढळून येईल आणि याहवेहने क्रोधाविष्ट होऊन त्याचा सदोम, गमोरा, अदमाह व सबोईम या देशांसारखाच नाश केला आहे हे त्यांना दिसेल.
सर्व राष्ट्रे विचारतील: “याहवेहने या देशाचे असे का केले? हा एवढा कोप व क्रोधाग्नी कशाला?”
आणि त्याचे उत्तर असेल: “ज्यावेळी याहवेह त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले होते, त्यावेळी त्यांच्याशी जो करार केला होता तो या लोकांनी मोडला म्हणून असे झाले.
सक्त मनाई असतानाही, ते ओळखत नसलेली दैवते, जी त्यांना देण्यात आली नाहीत, त्या दैवतांची त्यांनी उपासना केली आणि त्यांना नमन केले.
म्हणूनच याहवेहचा क्रोध या देशाविरुद्ध इतका भडकला की, या पुस्तकात नमूद केलेले सर्व शाप त्यांनी त्यांच्यावर आणले.
तेव्हा याहवेहने रागाने आणि मोठ्या क्रोधाने त्यांचे या देशातून उच्चाटन केले आणि त्यांना दूरच्या देशात घालवून दिले, जिथे ते आज देखील राहत आहेत.”
रहस्यमय बाबी याहवेह आमच्या परमेश्वराच्या आहेत; परंतु त्यांनी ज्यागोष्टी उघड रीतीने सांगितल्या, त्या आपल्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी आहेत, यासाठी की आपण या नियमशास्त्राच्या सर्व शब्दांचे पालन करावे.
मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या,
आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,
तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमची बंदिवासातून सुटका करतील आणि ते तुमच्यावर दया करतील आणि ज्या देशात त्यांनी तुम्हाला पांगवून टाकले असेल, त्या देशातून तुम्हाला एकत्र करतील.
तुम्ही पृथ्वीच्या अगदी दिगंतापर्यंत विखुरलेले असला, तरी याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तिथून पुन्हा परत आणतील.
याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात परत आणतील आणि तुम्ही तो ताब्यात घ्याल. ते तुमचे कल्याण करतील आणि तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्हाला अधिक संपन्न आणि बहुगुणित करतील.
याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या व तुमच्या वंशजांच्या अंतःकरणाची सुंता करतील, तुम्ही त्यांच्यावर पूर्ण मनाने व आत्म्याने प्रीती कराल, मग याद्वारे तुम्ही जिवंत राहू शकाल.
याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील.
तुम्ही परत याहवेहच्या आज्ञा पाळाल आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या त्यांच्या सर्व आज्ञेचे तुम्ही पालन कराल.