नहूम २:१-१०
१
हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे. आपल्या गडांवर पहारा दे, मार्गांची रखवाली कर, मोर्चा बांध, आपल्या सर्व शक्तिनिशी सैन्यांची संरक्षक फळी मजबूत कर!
२
जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.
३
ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.
४
रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; ते वीजगतीने दौडत आहेत.
५
निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे, तरी ते आपल्या मार्गांवर अडखळत आहेत. ते तटाच्या भिंतीकडे धाव घेतात; संरक्षक ढाल नियोजित ठिकाणी ठेवलेली आहे.
६
नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत आणि राजवाडे ढासळत आहेत.
७
अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे, की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे. तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत आणि त्यांचे ऊर बडवित आहेत.
८
निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे जिचे पाणी गळून चालले आहे. “थांबा, थांबा,” ते ओरडतात, पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही.
९
चांदी लुटा! सोने लुटा! निनवेहची संपत्ती येथील मौल्यवान वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे!
१०
ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings