लूक २०:१६-४०
१६
तो येईल आणि त्या भाडेकर्यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्यांना देईल.” लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते म्हणाले, “परमेश्वर करो असे कधीही न होवो!”
१७
येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला’ असे जे धर्मशास्त्रात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे?
१८
जे सर्व त्या खडकावर आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”
१९
प्रमुख याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी हा दाखला ऐकला, तेव्हा येशूंना ताबडतोब अटक करण्याचा मार्ग ते शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले पण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
२०
त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे.
२१
त्या गुप्तहेरांनी येशूंना प्रश्न विचारला: “गुरुजी, हे आम्हाला माहीत आहे की तुम्ही जे योग्य आहे ते बोलता व शिकविता आणि पक्षपात न करता परमेश्वराचा मार्ग सत्याने शिकविता.
२२
आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
२३
येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले,
२४
“मला एक नाणे दाखवा. या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचे नाव आहे?” “कैसराचे,” त्यांनी उत्तर दिले.
२५
मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
२६
अशा रीतीने लोकांपुढे त्यांना ते शब्दात पकडू शकले नाही. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि गप्प राहिले.
२७
पुनरुत्थान नाही असे मानणार्या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले,
२८
“गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.
२९
आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला.
३०
मग दुसर्या आणि तिसर्यानेही तिच्याशी लग्न केले आणि याप्रमाणे ते सातही भाऊ संतान न होताच मरण पावले.
३२
शेवटी ती स्त्री मरण पावली.
३३
आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”
३४
येशूंनी उत्तर दिले, “लग्न करण्याची रीत या पृथ्वीवरील लोकांसाठीच आहे.
३५
तरी, त्या युगात वाटेकरी होण्यासाठी आणि जे मृतांतून पुनरुत्थित होणार आहेत, ते लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही.
३६
आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत.
३७
मोशेच्या जळत्या झुडूपांच्या निवेदनात, तो प्रभूला ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोब यांचा परमेश्वर आहे’ असे म्हणतो यावरून त्याने हेच दर्शविले आहे की, मेलेले उठविले जातात.
३८
कारण ते मृतांचे परमेश्वर नसून, जिवंतांचे परमेश्वर आहेत आणि त्यांच्या दृष्टीने सर्व लोक जिवंत आहेत.”
३९
काही नियमशास्त्र शिक्षकांनी प्रतिसाद दिला, “गुरुजी, आपण फार योग्य उत्तर दिले.”
४०
मग कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
Settings