मुख्य मजकुरावर जा
लूक १४:७-२४

लूक १४:७-२४

पाहुणे पंक्तीत मानाच्या जागा पटकावण्याच्या खटपटीत असलेले पाहून त्यांनी त्यास दाखला सांगितला
“तुम्हाला कोणी लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण दिले, तर मानाची जागा घेऊ नका, कारण तुमच्यापेक्षा अधिक आदरणीय व्यक्तीस आमंत्रण दिले असेल
तर आमंत्रण देणारा, ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल, ‘या गृहस्थांना या जागेवर बसू द्या.’ तेव्हा तुमचा अपमान होईल व कमी प्रतीच्या जागेवर जाऊन बसावे लागेल.
१०
परंतु जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलेले असेल तर खालच्या जागेवर जाऊन बसा, म्हणजे जेव्हा तुमचा यजमान येतो, तो तुम्हाला म्हणेल, ‘मित्रा, चांगल्या जागेवर ये.’ तेव्हा दुसर्‍या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा सन्मान होईल.
११
कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.”
१२
नंतर येशू यजमानास म्हणाले, “जेव्हा तुम्ही दुपारी व संध्याकाळी मेजवानी देता, त्यावेळी तुमचे मित्र, भाऊ किंवा बहीण, नातेवाईक आणि श्रीमंत शेजारी यांना आमंत्रण देऊ नका, जर तुम्ही तसे कराल तर ते तुमच्या आमंत्रणाची परतफेड करतील.
१३
तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या.
१४
म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”
१५
येशूंच्या बरोबर पंक्तीस बसलेल्या एकाने हे ऐकले, व तो येशूंना म्हणाला, “धन्य आहे तो मनुष्य, जो परमेश्वराच्या राज्यातील मेजवानीत भोजन करेल.”
१६
येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली.
१७
मेजवानीच्या वेळेला त्याने त्याच्या दासांना ज्यांना आमंत्रणे दिली होती त्यांना, ‘चला आता भोजनाची सर्व तयारी झाली आहे’ असे सांगण्यास पाठविले.
१८
“परंतु ते प्रत्येकजण सबबी सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी नुकतेच शेत विकत घेतले आहे आणि ते मला जाऊन पहिले पाहिजे, म्हणून मला माफ करा.’
१९
“दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’
२०
“तिसरा म्हणाला, ‘माझा नुकताच विवाह झाला आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’
२१
“शेवटी दास आपल्या धन्याकडे परत आला आणि त्याला सर्व सांगितले. त्यावेळी धनी खूप रागावला व आपल्या दासाला आदेश दिला, ‘तू शहरातील रस्त्यांत व गल्ल्याबोळात जा आणि भिकारी, लुळेपांगळे आणि आंधळे सापडतील, त्यांना आण.’
२२
“ ‘महाराज,’ दास म्हणाले, ‘आपल्या आदेशाप्रमाणे केले आहे, परंतु अजून पुष्कळ जागा रिकामी राहिली आहे.’
२३
“त्यावेळी धनी दासाला म्हणाला, ‘आता गावातील रस्त्यावर आणि गल्लीत जा आणि जे तुला भेटतील, त्यांना आग्रहाने घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल.
२४
कारण ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना भोजनातले काहीही चाखावयास मिळणार नाही.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options