Skip to content
शास्ते ९:४५-५७

शास्ते ९:४५-५७

४५
संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.
४६
हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला
४७
जेव्हा अबीमेलेखाने हे ऐकले की नागरिक शेखेमाच्या बुरुजात एकत्र झाले आहेत,
४८
अबीमेलेख आणि त्याची सर्व माणसे सलमोन डोंगराकडे गेले. त्याने कुर्‍हाड घेतली आणि झाडांच्या फांद्या तोडून, त्या आपल्या खांद्यावर उचलून ठेवल्या. त्याने आपल्या लोकांना आदेश दिला, “त्वरा करा! तुम्ही मला जे करताना पाहिले तसेच करा!”
४९
म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले.
५०
त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले.
५१
त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले.
५२
अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना,
५३
एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला.
५४
त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला.
५५
जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले.
५६
अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांचे वध करून आपल्या वडिलांविरुद्ध जी दुष्टाई केली होती, तिची परतफेड परमेश्वराने अशा रीतीने केली.
५७
शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options