शास्ते ९:३१-५५
३१
त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत.
३२
म्हणून आता तू आणि तुझे लोक रात्री या आणि शेतांमध्ये दबा धरून बसा.
३३
सकाळी अगदी सूर्योदय झाल्याबरोबर शहरावर स्वारी कर. जेव्हा गाल आणि त्याचे लोक तुझ्याविरुद्ध लढण्यास बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी पाहा.”
३४
तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले.
३५
आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले.
३६
जेव्हा गालने त्यांना पाहिले, तेव्हा तो जबुलास म्हणाला, “पाहा, डोंगराच्या शिखरांवरून लोक उतरत आहेत!” जबुल त्याला म्हणाला, “नाही, ती केवळ डोंगराची सावली आहे जी तुला माणसांसारखी दिसत आहे.”
३७
परंतु गाल परत म्हणाला: “पाहा, मध्य उंचवट्यापासून लोक खाली येत आहेत आणि दैवप्रश्न करणाऱ्यांच्या एला वृक्षाच्या मागील वाटेने टोळी येत आहे.”
३८
तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!”
३९
तेव्हा गालने शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला.
४०
नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले.
४१
मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले.
४२
दुसर्या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली.
४३
म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला.
४४
अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला.
४५
संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.
४६
हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला
४७
जेव्हा अबीमेलेखाने हे ऐकले की नागरिक शेखेमाच्या बुरुजात एकत्र झाले आहेत,
४८
अबीमेलेख आणि त्याची सर्व माणसे सलमोन डोंगराकडे गेले. त्याने कुर्हाड घेतली आणि झाडांच्या फांद्या तोडून, त्या आपल्या खांद्यावर उचलून ठेवल्या. त्याने आपल्या लोकांना आदेश दिला, “त्वरा करा! तुम्ही मला जे करताना पाहिले तसेच करा!”
४९
म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले.
५०
त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले.
५१
त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले.
५२
अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना,
५३
एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला.
५४
त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला.
५५
जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings