Skip to content
योहान १२:२०-३६

ग्रीक लोक येशूला शोधतात; घटका आली आहे

योहान १२:२०-३६
२०
सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते,
२१
ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.”
२२
तेव्हा फिलिप्पाने त्याबद्दल आंद्रियाला सांगितले; मग त्या दोघांनी येशूंना सांगितले.
२३
येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
२४
मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो.
२५
जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल.
२६
जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील.
२७
“आता माझा जीव अस्वस्थ झाला आहे, मी काय म्हणू? ‘हे पित्या, या घटकेपासून मला वाचव?’ नाही, केवळ याच कारणासाठी मी या घटकेस आलो आहे.
२८
हे पित्या, आपल्या नावाचे गौरव करा!” नंतर स्वर्गातून वाणी आली, “मी ते गौरविले आहे आणि पुनः गौरवेन.”
२९
जो लोकसमुदाय तिथे उभा असून ऐकत होता तो म्हणाला, ही गर्जना झाली; इतर म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला.
३०
तेव्हा येशू म्हणाले, “ती वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी होती.
३१
आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल.
३२
आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन.”
३३
आपण कोणत्या प्रकारे मरणार आहोत हे सुचविण्यासाठी येशू असे बोलले.
३४
जमावाने म्हटले, “नियमशास्त्रामधून आम्ही ऐकले आहे की ‘ख्रिस्त सर्वदा राहील, तर मानवपुत्राला उंच केले पाहिजेत’ असे तुम्ही कसे म्हणता? हा ‘मानवपुत्र’ कोण आहे?”
३५
तेव्हा येशूंनी त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्याबरोबर राहील. तुम्हावर अंधकाराने मात करण्यापूर्वी प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही.
३६
तुम्ही प्रकाशाची मुले व्हावी म्हणून जोपर्यंत तुम्हाबरोबर प्रकाश आहे, तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलले व तिथून निघून त्यांच्यापासून गुप्त राहिले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options