उत्पत्ती ५०:१२-२६
१२
इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले:
१३
त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली.
१४
आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला.
१५
जेव्हा योसेफाच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील मरण पावले, ते म्हणाले, “आपण योसेफाला जी वाईट वागणूक दिली होती, त्याची जर त्याने वाईटाने आपल्याला परतफेड केली तर?”
१६
म्हणून त्यांनी योसेफाला निरोप पाठविला, “मरण्यापूर्वी तुझ्या वडिलांनी अशी सूचना दिली होती:
१७
‘तुम्हाला हे योसेफाला बोलायचे आहे: आम्ही तुझ्याशी जे अतिदुष्टाईचे वर्तन केले त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागावी.’ त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पित्याच्या परमेश्वराचे सेवक तुझी क्षमा मागत आहोत.” जेव्हा हा संदेश योसेफाकडे आला, तेव्हा योसेफ रडला.
१८
नंतर त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्याच्यापुढे पालथे पडून त्याला म्हणाले, “आम्ही तुझे गुलाम आहोत.”
१९
पण योसेफ त्यांना म्हणाला, “भीती बाळगू नका. मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे?
२०
तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत.
२१
म्हणून तुम्ही घाबरू नका; मी स्वतः तुमचा आणि तुमच्या मुलाबाळांचा पुरवठा करेन.” अशाप्रकारे त्यांच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले.
२२
योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला
२३
आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले.
२४
नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,”
२५
नंतर योसेफाने इस्राएली लोकांना शपथ देऊन म्हटले, “परमेश्वर तुमच्या मदतीला येतील आणि मग तुम्ही निश्चितच माझ्या अस्थी या जागेवरून घेऊन जाल.”
२६
अशा रीतीने योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला. मग त्याच्या प्रेतात मसाला भरण्यात आला आणि ते एका शवपेटीत घालून इजिप्तमध्ये ठेवण्यात आले.
Settings