उत्पत्ती ३०:१-२४
१
राहेलने पाहिले की याकोबाला तिच्यापासून मूल होत नाही, तेव्हा ती आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. “मला मूल द्या, नाहीतर मी मरून जाईन,” ती याकोबास म्हणाली.
२
त्यामुळे याकोब संतापून राहेलला म्हणाला, “मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे, ज्यांनी तुला मूल होण्यापासून रोखले आहे?”
३
मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.”
४
याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला,
५
आणि बिल्हा गर्भवती झाली व याकोबाच्या पुत्राला जन्म दिला,
६
राहेलने त्याचे नाव दान असे ठेवले, कारण ती म्हणाली, “परमेश्वराने मला न्याय दिला आहे; त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि मला एक पुत्र दिला आहे.”
७
राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला.
८
राहेलने त्याचे नाव नफताली असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.”
९
आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली.
१०
याकोबापासून लेआची दासी जिल्पाने एका पुत्राला जन्म दिला.
११
लेआ म्हणाली, “हा किती आशीर्वाद आहे!” म्हणून तिने त्याचे नाव गाद असे ठेवले.
१२
लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला.
१३
लेआने त्याचे नाव आशेर ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.”
१४
गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.”
१५
पण लेआ तिला म्हणाली, “माझा पती घेतलास तेवढे पुरे झाले नाही काय? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देखील तू घेशील काय?” राहेल म्हणाली, “ठीक आहे. तुझ्या पुत्रदात्रीच्या फळांच्या मोबदल्यात, याकोब आज रात्री तुझ्याकडे येईल.”
१६
जेव्हा संध्याकाळी याकोब शेतातून आला, लेआ त्याला भेटण्यासाठी बाहेर गेली. ती म्हणाली, “आज तुम्ही माझ्याबरोबर निजावे, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला त्या मोबदल्यात घेतले आहे.” त्याप्रमाणे त्या रात्री तो तिच्यासोबत निजला.
१७
परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला.
१८
तिने त्याचे नाव इस्साखार असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.”
१९
नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला.
२०
तिने त्याचे नाव जबुलून असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.”
२१
काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले.
२२
तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले.
२३
ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.”
२४
तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”
Settings